भीमनगरमधील मध्यरात्रीची घटना, मुंढवा पोलिसांनी चौघांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
प्रविण धनंजय माने (वय ३५, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी फाटा, मांजरी) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंढवा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद नोंदवली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे महेश सोमनाथ सरोदे (वय ३५) व त्याचे साथीदार आदित्य शरद भोसले (वय २२), आदित्य संजय रोकडे (वय २१) आणि कैलास ओव्हाळ (वय २६, सर्व रा. भीमनगर, मुंढवा) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १९ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता मुंढवा येथील भीमनगर परिसरातील बारामती अॅग्रो चिकन सेंटरसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण माने आणि महेश सरोदे हे दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात.
प्रविण माने यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यावरून महेश सरोदे याने मनात राग धरून प्रविण माने यांना फोन करून भीमनगर येथे बोलावून घेतले. प्रविण माने तेथे आल्यानंतर महेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यावर, उजव्या गुडघ्यावर, दोन्ही हातांवर व पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. तसेच त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकी देत त्यांचा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंढवा पोलिसांनी प्रथम महेश सरोदे व त्याच्या तीन साथीदारांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पुढील तपास करीत आहेत.

















