कोंढवा पोलिसांची कारवाई, चौघांना अटक करुन ३ गुन्हे आणले उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणांना बोलावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाईन पैसे मागवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची नावे राहिल अकिल शेख (वय १९, रा. सोमजी डी मार्ट पाठीमागे, कोंढवा), शाहिद शानूर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), रोहन नईम शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) आणि ईशान निसार शेख (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज) अशी आहेत.
याबाबत वाघोली येथील २७ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण ‘जेंडर’ नावाचे समलिंगी डेटिंग अॅप पाहत असताना ‘टॉप’ नावाच्या आयडीवरून त्यांना संदेश आला. त्यानंतर त्यांच्यात संवाद झाला.
त्यानंतर त्यांना कोंढव्यातील कौसरबाग येथील ममता स्वीट्स दुकानाजवळ बोलावण्यात आले. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते तेथे पोहोचले. त्यानंतर त्यांना कच्च्या रस्त्याने आत येण्यास सांगण्यात आले.
तेथे चौघे जण आले आणि त्यांनी फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना धमकावून ऑनलाईन पैसे मागविण्यास सांगण्यात आले. मागवलेले १० हजार रुपये त्यांनी स्वतःकडे ट्रान्सफर करून घेतले.
तसेच फिर्यादीकडील हिऱ्याचा स्टड, मोबाईल फोन, हेडफोन, चांदीचे ब्रेसलेट, चांदीच्या बाळ्या आणि चांदीची चैन असा एकूण ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेण्यात आला. ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती; मात्र भीतीमुळे त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली नव्हती.
यानंतर या टोळक्याने ३१ डिसेंबर रोजी रात्री कोंढव्यातील कौसरबाग परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाला लुबाडले. हा तरुण लघुशंकेसाठी थांबला असताना चौघांनी त्याला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला.
त्याच्याकडे १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्याच्याकडे केवळ एक हजार रुपये असल्याने उर्वरित पैसे ऑनलाईन मागविण्यास सांगण्यात आले. मागवलेले १० हजार रुपये आणि मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आला.
त्यानंतर ११ जानेवारी रोजी डेटिंग अॅप वापरणाऱ्या वाघोली येथील २७ वर्षीय तरुणाला शितल पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेण्यात आले. तेथून त्याला पानसरेनगर येथील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कूलसमोरील मोकळ्या मैदानात नेण्यात आले. चौघांनी त्याला मारहाण केली.
त्याच्याकडील एटीएम कार्ड घेऊन दोघांनी १० हजार ५०० रुपये काढून घेतले, तर इतर दोघांनी त्याच्या बोटातील दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन आणि चांदीची अंगठी काढून घेतली. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन या चौघांनी त्या तरुणाकडील ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. त्याने ही बाब आपल्या चुलत्याला सांगितली. त्यांच्या सांगण्यावरून २० जानेवारी रोजी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक तपासातून राहिल शेख याचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर राहिल शेख व त्याच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आणखी दोन गुन्हे केल्याचे उघड झाले असून, त्या गुन्ह्यांबाबतही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रवी गावडे पुढील तपास करीत आहेत.

















