कर्ज काढून दिलेले पैसे बाईवर उडवून काम न केल्याने ज्येष्ठाची आत्महत्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घराचे काम करण्यासाठी बँकेतून कर्ज काढून दोघांना पैसे दिले. मात्र त्यांनी काम करण्याऐवजी ते पैसे बाईच्या नादात उडवल्याने ज्येष्ठाने डायरीत सुसाईड नोट लिहून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दत्तात्रय जनार्धन लिपाणे (वय ६०, रा. साईसिद्धी अपार्टमेंट, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सुरज ऊर्फ मयूर दत्तात्रय लिपाणे (वय ३१) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी बाबुराव नंदन वाडघरे (वय ५१, रा. पोलीस कॉलनी, नीलआंगन अपार्टमेंट, गुजरवाडी फाटा, कात्रज) आणि धनाजी विष्णु गावडे (वय ४३, रा. शिवकृपा कॉलनी, वाघजाईनगर) यांना अटक केली आहे. ही घटना आंबेगाव येथील साईसिद्धी अपार्टमेंटमध्ये २० जानेवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज लिपाणे हे त्यांचे चुलते व चुलत भाऊ यांच्यासह १९ जानेवारी रोजी फिरण्यासाठी दापोली येथे गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या चुलत भावाच्या मोबाईलवर सुरज यांना त्यांच्या वडील दत्तात्रय लिपाणे यांना उलट्या झाल्याने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर ते सर्व दापोलीहून पुण्यात परतले; मात्र त्याआधीच दत्तात्रय लिपाणे यांचे निधन झाले होते. पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी वडिलांचे कपडे परत केले. वडिलांच्या पॅन्टच्या खिशात एक पॉकेट डायरी मिळाली.
त्या डायरीमध्ये लिहिले होते की, गावडे आणि वाडघरे या दोघांनी घराचे काम घेतले होते. त्यांना बँकेतून कर्ज काढून पैसे देण्यात आले होते. पैसे घेऊन एक वर्ष उलटूनही त्यांनी घराचे काम करून दिले नव्हते.
गावडे व वाडघरे यांनी घेतलेले पैसे बाईच्या नादात उडवले असल्याचे नमूद होते. “या दोघांमुळे मी आत्महत्या करीत आहे,” असेही त्या डायरीत लिहिले होते. त्यांनी गावडे व वाडघरे यांना १० लाख रुपये दिले होते.
डायरीतील सुसाईड नोट वाचल्यानंतर सुरज लिपाणे यांनी आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे पुढील तपास करीत आहेत.

















