उदय लळित, अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गजांचा होणार सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’, ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ तसेच विविध विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
हे पुरस्कार येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बाणेर येथील बंटारा भवन, मुंबई-पुणे महामार्गावर आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांच्या अध्यक्षतेखाली, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. उदय लळित यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया उपस्थित होत्या. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना यंदाचा ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस अँबेसेडर अवॉर्ड – २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. माजी सरन्यायाधीश न्या. उदय लळित, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे प्रणेते विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ॲड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी व जागतिक रणनीतीकार संजय पुरी यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
महेश सूर्यवंशी, योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲड. आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेंद्र कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कनक सहा, बासरीवादक पारस नाथ, ग्लोबल युथ अँबेसेडर दारासिंग खुराणा व गिर्यारोहक आशिष माने यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
सीए मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे, जलतरणपटू हातवी शहा यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, तर मास्टर ऋषी शिव प्रसन्न व मास्टर राघव मालपाणी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे.














