महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : प्राईड इंग्लिश स्कूल, भूम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नृत्य रंग’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचा भव्य आविष्कार आपल्या प्रभावी सादरीकरणातून साकारला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रताप भैय्या देशमुख व तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विलास शाळू, अॅड. सिराज मोगल, अमर सुपेकर व फैजान काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात काश्मिरी, पंजाबी, आसामी, दक्षिण भारतीय तसेच गोवा व गुजरात येथील पारंपरिक नृत्यप्रकार सादर करण्यात आले. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा, संगीत आणि नृत्यशैलीमुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा सुंदर आविष्कार रंगमंचावर पाहायला मिळाला. तालबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनयामुळे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची अप्रतिम छाप पाडत उपस्थितांची मने जिंकली. पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सुंदर उत्सव ठरला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, दीपिका टकले, मोनिका बोराडे तसेच सेविका आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.















