गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी : मांगडेवाडीतील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षात बसलेल्या महिलेला आडमार्गाने मांगडेवाडी येथील डोंगरात नेऊन, तिने वाद घातल्यानंतर तिचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने रिक्षाचालकासह ६ जणांना अटक केली आहे.
रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०, रा. भारतनगर, कात्रज), त्याचे मित्र अब्दुल मोहम्मद शेख (वय २३) आणि सोनू लक्ष्मण पवार (वय १९, दोघे रा. भारतनगर, रासकर पार्क, कात्रज), तसेच महादेव अर्जुन व्होरडे, साई अमित पुजारी आणि सोहेल हनीफ खान अशी आरोपींची नावे आहेत.
मांगडेवाडी येथील डोंगराळ भागातील क्रशर खाणीमध्ये १० फेब्रुवारी रोजी एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. डोंगराळ भाग असल्याने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते.
तसेच वैद्यकीय अहवालानुसार, महिलेचा मृतदेह घटनास्थळी आढळण्याच्या किमान २४ तास आधी तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. महिलेच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार नसल्याची खात्री पटली.
डोंगराळ भागापासून चारही बाजूंना तीन किलोमीटर परिसरातील तसेच महिला राहत असलेल्या परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले. त्यामध्ये ९७ महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून पाहणी करण्यात आली. त्यातून संशयित ३५ वाहने निवडण्यात आली. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात आली. त्यात भारतनगर येथील रिक्षाचालक केशव चौधरी याची रिक्षाही होती.
पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर तो गुन्ह्याची कबुली देऊ लागला. संबंधित महिला कोंढवा ते कात्रज अशी शेअरिंग रिक्षा समजून त्याच्या रिक्षाला हात दाखवला होता. त्यावेळी रिक्षामध्ये त्याचे नशेच्या आहारी गेलेले मित्र अब्दुल शेख व सोनू पवार उपस्थित होते.
त्यांनी महिलेला रिक्षामध्ये घेतले. तिने कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले. मात्र शॉर्टकटचा बहाणा करून तिला मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथील डोंगरात नेण्यात आले. त्या ठिकाणी महिलेनं ‘मला इथे का आणले?’ असा प्रश्न विचारून वाद घातला. त्यानंतर तिघांनी तिला मांगडेवाडी येथील खाणीतील दरीत फेकून देत तिचा खून केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात त्यांच्या मित्र महादेव व्होरडे, साई पुजारी व सोहेल खान यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींना पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
रिक्षाचे हुड बदलल्याने संशय बळावला – सीसीटीव्हीमधील ३५ वाहनांमध्ये केशव चौधरी याची रिक्षा आढळली. चौकशीदरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी रिक्षा आणि चौधरीकडे असलेली रिक्षा यामध्ये फरक होता. त्याने रिक्षाच्या हुडमध्ये जाणीवपूर्वक बदल केलेले आढळले. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला आणि त्यातून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला.
















