कोथरुडमधील महाविद्यालयाच्या परिसरातील घटना : तीन अल्पवयीन ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कोथरुडमधील यशवंतराव मोहोळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. फिर्यादी युवकाचा कोथरुडमधील यशवंतराव मोहोळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नंबर लागला होता.
बारावीचा पेपर देऊन तो दुपारी महाविद्यालयातून बाहेर पडत होता. त्यावेळी तिघा युवकांनी त्याला अडविले. त्याच्याशी भांडण काढून शिवीगाळ केली. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याचा उलटा वार करून त्याला जखमी केले, तर इतर दोघांनी हाताने मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. आरोपींकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सुळ पुढील तपास करीत आहेत.
















