आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Spread the love

पुणे : पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर रोडवरील वैदुवाडी येथे काही मुले दुचाकीवर थांबलेली आढळली. त्यांना पाहून कुत्री भुंकू लागली. कुत्री का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी काही जण उठले. तेव्हा मुले थांबलेली दिसली. लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून ही मुले पळून जाऊ लागली. चोर समजून लोक त्यांना पकडण्यासाठी धावले. त्यात एक तरुण सापडला. लोकांनी केलेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला.

रुपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील काही तरुण येरमाळ येथे दुचाकींवरून जात होते.

मात्र पैसे कमी पडल्याने ते अर्ध्या वाटेतून माघारी परतले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील दोघेजण वैदुवाडी येथील शंकर महाराज मठ रोडलगत थांबले होते. त्यांचे इतर साथीदार पुढे निघून गेले होते.

या दोघांना पाहून तेथील कुत्री भुंकू लागली. त्यामुळे वस्तीतील काही लोक बाहेर आले. कुत्री भुंकत असल्याने हे चोर असावेत आणि चोरी करण्यासाठी आले असावेत, असा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.

त्यातील एक जण पळून गेला, तर रुपेश शिंदे हा त्यांच्या तावडीत सापडला. लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी सव्वा दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

वानवडी पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. त्याचे वडील वानवडी पोलीस ठाण्यात आले असून ते फिर्याद देत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तपास करत आहेत.