आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त

Spread the love

पुणे : गावठी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून रचला जाणारा घातपाताचा कट उधळला आहे.

लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. सच्चाईमाता, पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कात्रज येथील गंधर्व लॉन्सच्या पुढे कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण पिस्तूल घेऊन वावरत आहे.

या माहितीची खातरजमा करून पोलीस पथक संबंधित ठिकाणी पोहोचले. त्यांनी लक्ष्मण कचरे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली.