उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा वैद्यकीय समितीचा अहवाल : कोरेगाव पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्क येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवून कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. नीलेश कोंद्रे व त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेले डॉक्टर (बुधरानी हॉस्पिटल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत उर्मिला प्रवीण म्हस्के (वय ३०, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रवीण म्हस्के (वय ३५) असे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. ही घटना बुधरानी हॉस्पिटलमध्ये २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी साडेबारा ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण म्हस्के यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता बुधरानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचार सुरू असताना प्रवीण म्हस्के यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्रवीण म्हस्के यांच्यावर झालेल्या उपचारासंबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन पोलिसांनी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे पाठविली.
ससून रुग्णालयातील वैद्यकीय समितीने या उपचाराची सर्व माहिती घेऊन चौकशी केली. उपचारामध्ये हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे म्हस्के यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला. त्यावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.



















