घाटपिंपरीत शिक्षक सन्मान सोहळा : जुन्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : न्यू हायस्कूल, घाटपिंपरी येथील इयत्ता दहावी बॅच २०००–०१ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आणि शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात साजरा केला.
वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील न्यू हायस्कूलमध्ये दि. २२ मार्च २०२६ रोजी इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बॅच २०००–०१ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, घाटपिंपरी संचलित या शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. आवारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. ए. आवारे, बी. बी. निरपळ, जी. एस. गलांडे, बी. बी. खोसे, डी. एस. सातपुते, डी. बी. माने, जी. टी. जगताप, ए. आर. गलांडे, व्ही. एन. मोरे, कबीर व्ही. व्ही. उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सातपुते व बानू गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. कुशावर्ता पवार, बालाजी मोटे, सुधीर सातपुते व बानू गायकवाड यांनी शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत शालेय जीवनातील अनुभव, आठवणी आणि यशोगाथा मांडल्या.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी ४×६ आकाराचे ५ व्हाईटबोर्ड भेट देण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल आवारे, संतोष इंगोले, अशोक पालकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले. “ही शाळा केवळ शिक्षणाचे ठिकाण नसून एक कुटुंब आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जुन्या आठवणी, मित्रमैत्रिणींची भेट आणि गुरुजनांचा सन्मान यामुळे हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.



















