पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच, आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले.
पुण्यातील एका ३५ वर्षांच्या महिलेला त्याने आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पसार झाला होता. पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे.
अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील महिलेने हिंमत करून हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिला ही मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली.
वैद्य हा मूळचा वसई येथील रहिवासी आहे. या महिलेच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. “माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो,” असे त्याने सांगितले.
२०२३ मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची भेट घेतली. तिला गुंगीचे औषध देऊन “मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस,” असे सांगून तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसई येथे बोलावले व तेथेही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य फरार झाला होता. वसई व पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. वसईहून पळून गेल्यानंतर तो पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला पकडले. मांजरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.




















