शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील शनिवारी सकाळची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कारागृह पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर शनिवारी सकाळी घडली.
पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या मैदानी चाचणीनंतर आता कारागृह पोलीस भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर ही चाचणी घेतली जात आहे. शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम बारकुल हा त्यात सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. त्यात ४०० मीटरच्या मैदानाला चार फेऱ्या मारायच्या असतात.
पुरुषोत्तमने मैदानाला तीन फेऱ्या पूर्ण केल्या. शेवटच्या फेरीसाठी तो धावत असताना त्याला अपस्माराचा झटका (फिट) आला आणि तो मैदानावरच कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या उमेदवारांच्या लक्षात हा प्रकार आला.
मैदानावर उपस्थित वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे ससूनमधील डॉक्टरांनी सांगितले.
पुरुषोत्तम बारकुल हा पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून कारागृह पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्याने भरतीसाठी तयारी केली होती. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाचा रहिवासी असलेल्या पुरुषोत्तमचा भरती प्रक्रियेदरम्यान धावताना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




















