महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात २६ मार्च रोजी स्वाती गौतम गेलडा लिखित ‘स्वसंजोत संगीत थेरपी डायरी’ या अनोख्या उपक्रमाचा भव्य प्रकाशन सोहळा पार पडला. वेलैरीना वुमन्स एम्पॉवरमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास वेलैरीना ग्रुपचे ज्ञानेश्वर चोरगे, संतोष बोदल, पुण्याच्या महापौर मंजुषा नागापुरे, अभिनेत्री श्वेता शिंदे, अभिनेत्री पुष्पा चौधरी, मेघराज भोसले, रंजना लोढा, विमल मुथा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘Heal Your Mind with स्वसंजोत संगीत थेरपी’ या डायरीचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत अशा प्रकारची संकल्पना संपूर्ण देशात क्वचितच पाहायला मिळते. या डायरीच्या माध्यमातून संगीताच्या साहाय्याने मानवी मन आणि शरीरावर प्रभावी उपचार करण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे.
मानसिक ताण, नैराश्य, राग, भीती, उच्च रक्तदाब (B.P.), मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांवर संगीत थेरपी ही प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयास येत आहे. ही एक शास्त्रीय पद्धत असून गाणी, वाद्यसंगीत आणि विविध ध्वनींच्या माध्यमातून ताण, चिंता, वेदना कमी करून मनाला शांतता मिळवून देण्यास मदत करते.
संगीतातील सुर आणि कंपनांचा मानवी मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊन व्यक्तीला नवचैतन्य आणि ऊर्जा प्राप्त होते. या यशस्वी कार्यक्रमासाठी डॉ. कन्याणी गेलडा, विराज गेलडा आणि रिचा गेलडा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



















