स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याची नागरिकांची अपेक्षा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राजकारण आणि समाजकारण हे दोन वेगवेगळे विषय असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मात्र, या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि उद्दिष्टे याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.
राजकारण करणाऱ्या व्यक्ती समाजकारण करतात की समाजकारण करणारे व्यक्ती राजकारणात येतात, हे समजणे अनेकदा कठीण होते. आपल्या देशात एखादी घटना घडली की ती मोठ्या प्रमाणावर सामुदायिक स्वरूपात चर्चिली जाते. मात्र, त्या घटनेमागील मूळ कारणांचा सखोल विचार क्वचितच केला जातो.
राजकारण करणाऱ्या व्यक्तींनी केवळ सत्तेपुरता विचार न करता आपल्या निर्णयांमुळे कोणाचाही अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजकारण हे देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी असावे, द्वेष पसरवण्यासाठी नव्हे.
समाजकारण करताना देखील त्या विषयाची सखोल जाण असणे गरजेचे आहे. केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी समाजकारण केल्यास त्याचा नागरिकांना अपेक्षित लाभ होत नाही. लोकांच्या खऱ्या गरजा ओळखून त्यानुसार कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज अनेक नागरिकांना राजकारण करणाऱ्या काही व्यक्तींविषयी अविश्वास वाटू लागला आहे. कारण काहीजण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
देशातील काही नागरिक देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात, तर काहीजण नकारात्मक विचारांमुळे समाजात गोंधळ निर्माण करतात. प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे, मात्र हे विचार समाजहितासाठी असणे गरजेचे आहे.
शिक्षण हे योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे. सुशिक्षित व्यक्ती समाज आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. तसेच समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी सक्षमपणे पुढाकार घेऊ शकते.
समाजातील काही घटना आपल्या आवाक्यात असतात, तर काही नसतात. तरीही एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सकारात्मक विचार देऊन अशा घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो. अनेक गैरप्रकार हे शिक्षणाचा अभाव, चुकीचे वातावरण किंवा नकारात्मक विचार यामुळे घडतात.
त्यासाठी राजकारणातील नेत्यांनी उच्च पातळीवरून समाजहिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियम आणि कायदे लागू करून समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
समाजात कार्यरत असलेल्या काही संस्था खरोखरच लोकहितासाठी काम करतात, तर काही संस्था स्वतःच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अशा संस्थांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊन स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करणे आवश्यक आहे. देशात वाढणाऱ्या गुन्हेगारी आणि अमानवी घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.
देशाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देण्याऐवजी काही वेळा त्यांना अडथळे निर्माण केले जातात, ही चिंतेची बाब आहे. शेवटी, लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी एकमेकांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांमधूनच देशाला प्रगतीच्या उच्च पातळीवर नेणे शक्य आहे.




















