शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष : डिजिटल अरेस्टची दाखविली होती भीती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बतावणीने सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून कोथरूडमधील एका ज्येष्ठ महिलेची १ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याची बतावणी करून सहकारनगरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी चोरट्यांनी संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना संदेश पाठवून शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगत जाळ्यात ओढले.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १ कोटी ५२ लाख रुपये जमा करून घेतले. पैसे जमा केल्यानंतर कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
बँक खात्याचा काळ्या पैशांच्या व्यवहारात वापर झाल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची १ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत ७७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही महिला कोथरूड भागात राहतात. बँक खात्याचा २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात वापर झाल्याचे सांगून या प्रकरणात कारवाई होणार असल्याची भीती दाखवण्यात आली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना पैसे जमा करण्यास भाग पाडले.
वीस दिवसांत ज्येष्ठ महिलेने वेळोवेळी १ कोटी ६२ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर चोरट्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेकडे करण्यात येणार आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत सावधान – सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना विविध आमिषे तसेच कारवाईची भीती दाखवून फसवले जाते. आयुष्यभर पै-पै करून साठविलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा केली जाते. विशेषतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून केवळ खात्यात आभासी नफा दाखविला जातो. प्रत्यक्षात चोरटे कोणतीही गुंतवणूक करत नाहीत. ऑनलाइन गुंतवणुकीच्या या आमिषाला बळी पडू नका. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















