आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

Spread the love

पुणे : पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून नर्‍हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल व एक काडतूस जप्त केले आहे.

अमोल पद्माकर सोळुंके (वय २४, रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी; सध्या रा. पार्वती हाइट्स, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या मागे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल सोळुंके हा मूळचा बीड जिल्ह्यातील राहणारा आहे.

त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यापूर्वी २०२१ व २०२२ मध्ये दंगल घडवून मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यातील गावाकडील वादातून सुरक्षेसाठी त्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून हे पिस्टल घेतल्याचे सांगितले आहे.

नर्‍हे पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व शाहू राठोड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मानस ग्राऊंड येथे एक जण संशयितरीत्या फिरत असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

माहितीची खातरजमा केल्यानंतर तेथे एक संशयित व्यक्ती दिसून आला. पोलिसांनी त्याला जागीच पकडले. अमोल सोळुंके याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. नर्‍हे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार संजय शिंदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, शाहू राठोड, कांतीलाल धोत्रे यांनी केली आहे.