बँकॉक, म्यानमारप्रमाणे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर काढणार होते नवी मुंबईत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटरमध्ये काम केलेले पश्चिम बंगाल व पंजाब येथील दोघे जण नवी मुंबईतील व्यावसायिकाच्या निमंत्रणावरून येथे कॉल सेंटर सुरू करणार होते; मात्र सुरुवातीलाच ते पोलिसांच्या हाती लागले.
सुशील भगवान जुवाटकर (वय ४२, रा. नेरुळ वेस्ट, नवी मुंबई), पंकज राज कपूर (वय ३८, रा. नेरुळ, नवी मुंबई; मूळ रा. जालंधर, पंजाब) आणि निश्चल टंकबीर बरेयली (वय २७, रा. नेरुळ, नवी मुंबई; मूळ रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, २ क्यूआर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळ्या २४ बँकांचे अकाउंट ओपनिंग किट, ५ डेबिट कार्ड असा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच ६२ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.
शेअर/आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाला २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपींनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात सव्वा लाख रुपये जमा करून घेतले होते.
हे खाते ‘आर्शिल इंडस्ट्रिज प्रा. लि.’ या नावाने नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथकाला नवी मुंबईला रवाना करण्यात आले.
या पथकाने तुर्भे पोलिसांच्या मदतीने सुशील जुवाटकर याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार पंकज कपूर, निश्चल बरेयली व इतरांनी मिळून हे बँक खाते वापरल्याची कबुली दिली. पंकज कपूर व निश्चल टंकबीर बरेयली हे त्याच्याच ‘आर्शिल इंडस्ट्रिज’ या कंपनीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील तसेच पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, सुरज शिंदे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निचित, सोपान बोधवड, नितेश बिचेवार, दिपाली चव्हाण, भाविका प्रधान यांनी ही कारवाई केली. सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवून देण्यास मदत केली.
बँकॉक, म्यानमार येथील कॉल सेंटरमध्ये काम : पंकज कपूर आणि निश्चल बरेयली यांनी बँकॉक व म्यानमार येथे जाऊन सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम केल्याचे सांगितले. नवी मुंबई येथे सुशील जुवाटकर यांच्या सांगण्यावरून नवीन कॉल सेंटर सुरू करण्यासाठी ते आले होते. त्यांच्या झडतीत ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, २ क्यूआर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळ्या २४ बँकांचे अकाउंट ओपनिंग किट, ५ डेबिट कार्ड असा माल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीचे ६२ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.




















