४० लोकांची केली फसवणूक : देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी, दागिने मोड करण्यासाठी तसेच सोने तयार करून देण्याच्या नावाखाली २६ लाख ६० हजार रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ४० हून अधिक लोकांची फसवणूक करून सराफ बापलेक फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ४६ वर्षीय नागरिकाने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अंबालाल जिवाजी सोनी (वय ५६) आणि रोहित अंबालाल सोनी (वय ३०, रा. विकासनगर, किवळे) या बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार देहुरोड येथील मेन बाजारातील सुन्धा ज्वेलर्स येथे १ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबालाल सोनी हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत.
त्यांचे देहुरोडमधील मेन बाजारात सुन्धा ज्वेलर्स हे सराफी दुकान २०२० पासून सुरू होते. काही वर्षांत त्यांनी परिसरात विश्वास निर्माण केला होता. त्याच विश्वासातून अनेकांनी त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मोड करण्यासाठी तसेच दागिने दुरुस्तीसाठी दिले होते. काही जणांनी सोने खरेदी करण्यासाठी रोख रक्कमही दिली होती.
३ फेब्रुवारीपासून त्यांचे दुकान बंद असल्याचे दिसून आले. अनेक दिवस दुकान बंद असल्याचे दिसल्यानंतर लोकांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा सोनी हे पत्नी, मुलासह संपूर्ण कुटुंबाला घेऊन पळून गेल्याचे उघड झाले.
लोकांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत किमान ४० लोकांची ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने व २६ लाख ६० हजार १५० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. आणखीही लोकांच्या तक्रारी येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. देहुरोड पोलीस दोघा बापलेकांचा शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे तपास करत आहेत.















