पदोन्नतीसाठी शिक्षक सेवकाकडे मागितली होती लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडे ३ लाखांची लाच मागून पावणेतीन लाख रुपये स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, उंड्री; मूळ रा. शेगाव, जि. बुलढाणा), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२, रा. रॉयल रहाडगी ग्रीन फेज १, शिवराजनगर, काळेवाडी) आणि कनिष्ठ सहायक आतिश कैरू शिंदे (वय ४०, रा. भैरवनाथ कॉम्प्लेक्स, मोहम्मदवाडी; मूळ रा. वाडेबोल्हाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी एका शिक्षण सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची त्यांनी भेट घेतली.
जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही अधिसंख्य पदावर वर्ग करून घेण्यासाठी तसेच संबंधित सेवा व निवृत्ती विषयक लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवतो, असे सांगून खंदारे यांनी त्यांच्याकडे ३ लाख रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर खंदारे, रंधवे आणि शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून शिक्षण सेवकाकडून २५ हजार रुपये घेतले. तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. उर्वरित पावणेतीन लाख रुपये घेण्यासाठी तक्रारदाराला घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलावण्यात आले.
सोमवारी, ६ एप्रिल रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंधवे आणि शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर खंदारे, रंधवे आणि शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सहायक आयुक्त नीता मिसाळ तपास करत आहेत.















