आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

Spread the love

पुणे : सातारा येथील प्रतापगंज पेठमधील आयडीबीआय बँकेत हातचलाखी करून महिलेची फसवणूक करत ७ हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी पकडले आहे.

इब्राहिम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सातारा येथील प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बँकेत वृद्ध महिलेकडे असलेली रोख रक्कम मोजून देतो, असे सांगून हातचलाखी करून त्यातील ७ हजार रुपये चोरट्याने चोरून नेले होते.

२७ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली होती. शाहूपुरी पोलिसांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र पाठवले होते. पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे फुटेज मिळाले होते. शिवाजीनगर पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेंद्र कडू यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सातारा येथील बँकेत हातचलाखी करणारा चोरटा हा इब्राहिम इराणी आहे.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इब्राहिम इराणी याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार संतोष मेमाणे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस अंमलदार महेंद्र कडू, रोहित झांबरे यांनी केली आहे.