डेक्कन पोलिसांनी मोहम्मद बागवानला केली अटक : संजय अगरवाल फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या लक्झरी कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करू, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन दोघांनी ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार संजय ब्रह्मानंद अगरवाल (रा. कुंदन होम, एलफिस्टन रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
याबाबत नयन बलबीर अगरवाल (वय २८, रा. आरती अपार्टमेंट, एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एरंडवणे येथील आरती अपार्टमेंट येथे सप्टेंबर २०२२ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी त्या वडील बलबीर अगरवाल यांच्यासोबत चारचाकी गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होत्या. संजय अगरवाल हा त्यांच्या वडिलांचा मित्र असून त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते.
सप्टेंबर २०२२ दरम्यान संजय अगरवाल त्यांच्या घरी आला होता. त्याने मोहम्मद बागवान याच्यासोबत जुन्या चारचाकी गाड्यांचा खरेदी-विक्री व्यवसाय करू, असे सांगितले. त्यानुसार, तो गाड्यांचे फोटो पाठवेल, त्या गाडीची आगाऊ रक्कम देऊन गाडीची डिलिव्हरी झाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यायची, असे ठरले होते.
काही दिवसांनी संजय अगरवालने काही गाड्यांचे फोटो पाठवले. गाडीचे मॉडेल पसंत पडल्यानंतर फिर्यादींनी आगाऊ रक्कम दिली. त्यानंतर ५ गाड्यांची डिलिव्हरी वेळेत दिली गेली, त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
त्यानंतर १६ चारचाकी गाड्यांसाठी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून १ कोटी २१ लाख रुपये दिले. चौकशी केल्यावर संजय अगरवालने पुढील १५ दिवसांत सर्व गाड्यांची डिलिव्हरी देऊ, असे सांगितले. मुदतीत गाड्या न दिल्यास सर्व रक्कम परताव्यासह परत केली जाईल, असेही त्याने सांगितले.
ठरलेल्या १६ गाड्यांपैकी एक ऑडी गाडी त्यांनी दिली. ही गाडी फिर्यादींनी एका ग्राहकाला विकली; परंतु गाडीत तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ग्राहकाने ती परत केली. त्यानंतर फिर्यादींनी ग्राहकाची संपूर्ण रक्कम परत केली.
उरलेल्या गाड्या लवकरच देतो, असे सांगून संजय अगरवालने ऑडी गाडी परत घेतली. त्या गाडीकरिता दिलेल्या १८ लाख ५० हजार रुपयांपैकी त्याने ९ लाख रुपये परत केले. उर्वरित ९ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला.
तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू, असे सांगितल्यानंतर त्याने २३ मार्च २०२५ रोजी १० लाख रुपये आणि २५ जून २०२५ रोजी ५ लाख रुपये दिले. उर्वरित ९७ लाख १ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर अगरवाल नेहमी पुढील तारखा देत राहिला.
गेल्या वर्षभरात उरलेली रक्कम परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद नयन अगरवाल यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील करीत आहेत.
















