आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

Spread the love

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, यंदाही ‘No DJ, No Dolby’ धोरण कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. ८ एप्रिल रोजी संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीस विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉल्बी धारक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, DJ व Dolby मुळे होणारे ध्वनीप्रदूषण हे गंभीर स्वरूपाचे असून त्याचा थेट परिणाम लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

त्यामुळे यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने ठणकावून सांगितले. यंदाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पारंपरिक पद्धतीनेच साजरी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील पूर्णपणे DJ व Dolby बंद करणारा पहिला जिल्हा ठरला असून, ही परंपरा कायम ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

दरम्यान, मिरवणुकीत DJ किंवा Dolby वापरल्यास ध्वनी मापन यंत्राद्वारे तत्काळ तपासणी केली जाईल. आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास संबंधित मंडळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बैठकीत उपस्थित सर्व शांतता समिती सदस्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळांनी ‘No DJ, No Dolby’ धोरण पाळण्याची शपथ घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस कार्तीकेयन, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, सर्व शांतता समितीचे सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, डॉल्बी धारक तसेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.