लक्ष्मीनगर पोलिसांनी काही तासांत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमधील भारत डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर कापून नेणाऱ्या चोरट्यांना लक्ष्मीनगर पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले.
दिनेश भगवान साळवे (वय २२, रा. यशवंतनगर, येरवडा), बद्रुजमान जिहाउल शेख (वय २४, रा. ताडीगुत्ता, येरवडा), अब्राहिम नरेश यादव (वय २०, रा. ताडीगुत्ता, येरवडा) आणि सचिन सुरेश गवळी ऊर्फ गोलड्या (वय ३६, रा. ताडीगुत्ता, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत चेतन मोहन रावळ (वय ३८, रा. सोहरब रेसिडेन्सी, ताडीवाला रोड) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भारत डायग्नोस्टिक सेंटरचे एमआरआय मशीन आहे. या मशीनची कॉपर वायर भिंतीच्या बाहेर आलेली होती. चोरट्यांनी ती वायर कापून आतून ओढून बाहेर काढली. सुमारे ३० मीटरची कॉपर वायर चोरून नेण्यात आली होती.
हा प्रकार ५ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आला. एमआरआय मशीनची वायर चोरीला गेल्याने त्याचे काम बंद पडले. त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय झाली असून त्यांना दुसऱ्या ठिकाणी एमआरआय करण्यासाठी जावे लागले.
या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अंमलदार भिमराव कांबळे आणि सुरज ओंबासे यांनी घटनास्थळाचे तसेच इतर सुमारे ५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दिसणारे संशयित आरोपी सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.
ताडीगुत्ता परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी सचिन गवळीचे नाव सांगितले. त्यानंतर सचिन गवळीला अटक करून त्याच्याकडून ३५ हजार रुपयांची ३० मीटर कॉपर वायर जप्त करण्यात आली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनित जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जगताप तसेच पोलीस अंमलदार शिंदे, भिमराव कांबळे, शेख, परदेशी, सुरज ओंबासे, गायकवाड, जाधव आणि शिंदे यांनी पार पाडली.

















