सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन उकळले होते १० हजार रुपये
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्राचार्यांना पोक्सो गुन्ह्यामध्ये अडकवू, अशी धमकी देऊन ७ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणाला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस अंमलदार गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित केलेल्या तिघा पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही वाघोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वाघोली येथील झेड रेसिडेन्सी येथे काही मुले रूममध्ये राहतात.
ते रूमवर मुली आणून व्हिडिओ बनवितात, असा संशयास्पद कॉल २ मार्च रोजी रात्री ९ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्यानुसार वाघोली गावठाण बीट मार्शल गणेश महादेव खाडे आणि किरण भिकाजी कांबळे यांनी कॉलच्या अनुषंगाने झेड रेसिडेन्सी सोसायटीतील सभासदांकडे चौकशी करून एका २४ वर्षीय तरुणाला ठाणे अंमलदार किरण ज्ञानेश्वर अब्दागिरे यांच्या समोर हजर केले.
हा तरुण मूळचा राजस्थान येथील आहे. पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असताना कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस हवालदार किरण अब्दागिरे यांनी तक्रारदारास तुमच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवू, नोकरी घालवू तसेच नातेवाईकांना बोलावू, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.
गणेश खाडे यांनी तक्रारदारास चापट मारली. किरण कांबळे यांनी तक्रारदाराच्या मैत्रिणीला विनाकारण ताटकळत ठेवून चौकशी केली आणि कोणतीही कारवाई न करता तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. तक्रारदाराला त्याच्या फोनपेवरून पोलीस अंमलदार गणेश खाडे यांनी दाखविलेल्या मोबाईलमधील ‘ओंकार ऑटो गॅरेज’ या स्कॅनरवर १० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार तरुणाकडे चौकशी करण्यात आली असता संबंधित पोलीस अंमलदारांनी सर्वांनी मिळून पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले. वाघोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अहवालावरून पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी या तिघा पोलिसांना निलंबित केले आहे.
दारू पिऊन गैरवर्तन करणारे दोन हवालदार निलंबित – कामावर असताना दारू पिऊन येऊन गैरवर्तन करणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस हवालदारांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. पोलीस हवालदार सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार संजय कराड हे उंड्री पोलीस चौकीत ड्युटी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता ड्युटी सोडून दारू पिऊन मोटारसायकलवरून काळेपडळ पोलीस ठाण्याच्या आवारात आले. पोलीस ठाण्यातील बाकड्यावर बसलेल्या तक्रारदार महिलेच्या पायाला धडक देऊन त्यांना किरकोळ दुखापत केली. इतरांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. वैद्यकीय तपासणीत मद्यार्काचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस हवालदार सचिन जाधव यांना २१ मार्च रोजी दुपारी अडीच ते रात्री ९ या वेळेत लोणी काळभोर येथील एमआयटी येथे परीक्षेच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या सोबत कर्तव्यात नेमण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी बंदोबस्ताची तपासणी केली असता सचिन जाधव हे दारू पिल्याचे आढळून आले. वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्यार्काचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघा हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.



















