आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लाच घेताना सहकारी सोसायटीच्या सचिवाला अटक

Spread the love

पुणे : जुने पीक कर्ज भरून नवीन पीक कर्ज पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून मंजूर करून घेतल्याबद्दल मोबदला म्हणून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला रंगेहात पकडले.

नाना चंद्रकांत बोराटे (वय ४३, रा. गोकळी, इंदापूर) असे अटक केलेल्या सचिवाचे नाव आहे. नाना चंद्रकांत बोराटे हे शासनाच्या सहकार विभागातील कर्मचारी असून सध्या ते जय भवानी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पंधरवडी येथे सचिव म्हणून नोकरीला आहेत.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील पुणे जिल्हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज २४ मार्च २०२६ रोजी भरले. नवीन कर्ज मिळण्यासाठी जय भवानी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पंधरवडी यांच्या मार्फत पुणे जिल्हा बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्याअनुषंगाने तक्रारदार हे ७ एप्रिल रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वडापुरी शाखेत नाना बोराटे यांना भेटले. त्यांनी तक्रारदार यांचे २ लाख ७६ हजार रुपयांचे नवीन पीक कर्ज मंजूर केले असून, त्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून २ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी ८ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात नाना बोराटे यांनी पीक कर्ज मंजूर करून दिल्याच्या बदल्यात मोबदला म्हणून १ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जय भवानी विकास सेवा सहकारी सोसायटी, पंधरवडीच्या आवारात ९ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्वीकारताना नाना बोराटे यांना रंगेहात पकडण्यात आले. इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करत आहेत.