फ्लॅट विक्री करण्यास दिला होता नकार : कोथरुडमधील घटनेत पतीवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट विक्रीस नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण करून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी प्रमोद बसवराज हंदीगुंद (वय ४७, रा. बंगला क्रमांक ११, सर्वत्र सोसायटी, पौड रोड, कोथरुड) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून, त्यांच्या संयुक्त नावावर वारजे येथील सार्थ सिन्क्लेअर येथे एक फ्लॅट आहे. या फ्लॅटच्या विक्रीबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, फिर्यादी महिलेने फ्लॅट विकण्यास तसेच त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सही करण्यास नकार दिला.
यावरून संतप्त झालेल्या प्रमोद हंदीगुंद यांनी पत्नीला शिवीगाळ करत उजव्या हाताच्या मुठीने तिच्या नाकावर जोरात बुक्की मारली. या मारहाणीमुळे महिलेच्या नाकातून रक्तस्राव होऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
















