एकाच दिवशी सायबर चोरट्यांनी एकाच कारणासाठी घातला गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नर्हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघांची गॅस कनेक्शन कट करण्याच्या नावाखाली ९ एप्रिल या एकाच दिवशी फसवणूक करण्यात आली आहे.
बिबवेवाडी-कोंढवा रोड येथील ७१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला फोन करून, तुमचे गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली.
तसेच व्हॉट्सअॅपवर बिल न भरल्याबाबतची नोटीस पाठवली. त्यामध्ये एक लिंकदेखील होती. ज्येष्ठ नागरिकाने ती लिंक उघडली. सायबर चोरट्यांनी फिर्यादीला फोन करून क्रेडिट कार्डचा नंबर व ओटीपी विचारला असता, फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी नंबर सांगितला नाही. असे असतानाही त्यांच्या बँक खात्यातून २९ हजार रुपये कट झाले. पोलीस निरीक्षक नवले तपास करत आहेत.
धायरी रोड येथील ४५ वर्षांच्या नागरिकाने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी मोबाईलवर फोन करून एमएनजीएल गॅस बिल भरण्यास सांगून मीटर रीडिंगसाठी एक एपीके फाइल पाठवली.
नागरिकाने ती फाइल उघडताच त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस सायबर चोरट्यांनी घेतला आणि त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ५८७ रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. पोलीस हवालदार सोनकांबळे तपास करत आहेत.
















