चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ डॉक्टर व परिचारिकांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उपचार करताना प्रचलित मानकांचा अवलंब करण्यात आला नाही, तसेच रुग्णावर योग्य प्रकारे सतत देखरेख ठेवली गेली नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांची अदिती गिते हिचा मृत्यू झाला. अदिती गिते हिच्या मृत्यूप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चिन्मय हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ डॉक्टर व परिचारिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेत चिन्मय हॉस्पिटलच्या नावाने नोंद असताना तेथे ‘चिन्मय इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स’ या नावाने लहान मुलांचे हॉस्पिटल चालविले जात होते. तसेच बी.ए. शिक्षण घेतलेल्या महिलेला परिचारिका म्हणून नेमण्यात आले होते.
या हॉस्पिटलच्या अनेक धक्कादायक बाबी या प्रकरणातून उघडकीस आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. मुकुंद संगमनेरकर यांनी इतर डॉक्टर व परिचारिकांना हाताशी धरून संपूर्ण कागदपत्रे बदलण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, परिचारिका मनीषा शिंदे, सरिता सुतार (चिन्मय हॉस्पिटल, नवी पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अॅड. हनुमान दत्ताराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान नवी पेठेतील चिन्मय हॉस्पिटल येथे घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. हनुमान गिते यांना अदिती ही ११ महिने १८ दिवसांची मुलगी होती. तिला उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांनी तिला चिन्मय नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले.
तेथील डॉ. श्रीधर जाधव यांनी मुलीची तपासणी केली. तिच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे व तिला अॅडमिट करावे लागेल, असे सांगून त्यांनी मुलीचे फोटो व व्हिडिओ काढून डॉ. मुकुंद संगमनेरकर यांना पाठवले व उपचार सुरू केले.
डॉ. श्रीधर जाधव व डॉ. गणेश आरेकर यांनी ‘अक्वालाईव्ह एनएस ५०० एमएल’ सलाईन लावले. त्यांनी ते पूर्ण वेगाने दिले. त्यासोबत दोन इंजेक्शनही देण्यात आले. मुलीच्या पायाला सुरुवातीला हार्टबीट मोजण्यासाठी छोटे मशीन लावण्यात आले होते.
मशीनचे चार्जिंग नसल्याने ते १० मिनिटांत बंद पडले. त्यानंतर दुसरे मशीन आणले, तेही चालले नाही. मोठे मशीन आणले, पण ते फक्त टेबलवर ठेवले व सुरू केले नाही. मुलीचे रक्ताचे नमुने लॅबला पाठवण्यात आले.
रात्री ८ वाजता डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर व परिचारिका मनीषा शिंदे वॉर्डमध्ये आले. त्यांनी तिचे वय विचारले व जिन्याजवळ जाऊन चर्चा केली. डॉ. गणेश आरेकर यांनी बाळाला पाणी पाजू नये, असे सांगितले.
काही वेळाने डॉ. श्रीधर जाधव यांनी ओआरएस दिले तरी चालेल, असे सांगितले; परंतु पुन्हा डॉ. आरेकर यांनी ओआरएसही देऊ नये, असे सांगितले. रात्री ९ वाजता पहिले सलाईन संपल्यानंतर परिचारिका सरिता सुतार यांनी दुसरे ‘अक्वालाईव्ह एनएस ५०० एमएल’ सलाईन लावले.
त्यानंतर डॉ. गणेश आरेकर वॉर्डमध्ये आले व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले. मात्र, पिवळी उलटी झाल्यास आयसीयू असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, असे सांगून ते निघून गेले. रात्री १० वाजता मुलीने पिवळी उलटी केली.
गिते यांनी नर्सला सांगून डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. त्यावर तिने मुलीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, असे सांगितले; परंतु डॉ. गणेश आरेकर वॉर्डमध्ये आले नाहीत. रात्री साधारण ११ वाजून ५० मिनिटांनी परिचारिका सलाईन तपासण्यासाठी आल्या असता मुलगी काहीच हालचाल करत नसल्याचे व श्वास घेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी डॉक्टरांना कळवले. १०-१५ मिनिटांत डॉ. गणेश आरेकर, डॉ. संगमनेरकर व परिचारिका वॉर्डमध्ये आले व त्यांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अॅड. गिते यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी अर्ज केला.
त्यानुसार त्यांना सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. अॅड. गिते यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रे ससून रुग्णालयातील वैद्यकीय समितीकडे पाठवली. समितीने दिलेल्या अभिप्रायानुसार, रुग्णाच्या उपचारामध्ये प्रचलित मानकांचा अवलंब करण्यात आलेला दिसत नाही.
तसेच रुग्णावर योग्य प्रकारे सतत देखरेख ठेवली गेली नाही. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अभिप्रायाच्या आधारे अॅड. गिते यांनी डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक बाबी समोर – हा प्रकार घडल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दुसऱ्या मजल्यावर राहणारे डॉ. संगमनेरकर हे पळत खाली आले. त्यांनी बाळाची फाईल घाईघाईने ताब्यात घेऊन समोरील वॉर्डमध्ये लपवून ठेवली. डॉ. गणेश आरेकर वॉर्डमध्ये बराच वेळ होते. नंतर बाहेर येताना त्यांच्या हातात फाईल नव्हती. मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी परिचारिकांच्या टेबलावर असलेले दैनंदिन औषध रजिस्टर ताब्यात घेऊन ते समोरील वॉर्डमध्ये लपवून ठेवले. तसेच त्या रजिस्टरमधील मूळ नोंदींमध्ये फेरफार करून खोट्या नोंदी करण्यात आल्या डॉ. संगमनेरकर व डॉ. आरेकर यांनी मुलीच्या रिपोर्ट फाईलमध्ये वारंवार फेरबदल केले. २२ मे २०२५ रोजी रात्री २.१८ पासून सकाळी साडेचार वाजेपर्यंत त्यांनी फाईल कोणालाही न दाखवता सतत बदल केले. सकाळी डॉ. श्रीधर जाधव हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी मूळ फाईलमध्ये स्वतःहून काही नोंदी बदलून त्याची झेरॉक्स प्रत पोलिसांना दिली. सर्व डॉक्टरांनी चर्चा करून गिते यांना मृत्यूचे कारणाचा रिपोर्ट दिला. मृत्यू दाखल्यावर डॉ. जाधव यांनी सही केली; मात्र त्यात चुकीचे कारण व वेळ नमूद केली होती. ते सकाळी ७.२२ वाजता हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्यांनी बाळाचा मृत्यू तपासलेलाही नव्हता. तरीदेखील त्यांनी खोटा मृत्यू दाखला दिला. बाळाला ५०० एमएलच्या दोन सलाईन बाटल्या देण्यात आल्या होत्या, मात्र रिपोर्टमध्ये ३०० एमएल असे चुकीचे नमूद करण्यात आले. नाईट चार्टिंगमध्ये वेळ, टीम व इतर माहिती खोटी नमूद करण्यात आली. मशीन बंद असतानाही चार्टमध्ये नोंदी करण्यात आल्या. रिपोर्टमध्ये बाळाला सतत मॉनिटरिंगमध्ये ठेवले होते, असे नमूद केले आहे; परंतु प्रत्यक्षात कोणतेही मॉनिटरिंग करण्यात आले नव्हते. वॉर्डमध्ये ऑक्सिजनची सुविधा नसतानाही ऑक्सिजन दिल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. डॉ. संगमनेरकर हे रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट २२ मे रोजी रात्री ८ वाजता आल्यानंतर वॉर्डमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा बाळाची तपासणी केली नाही आणि पूर्णपणे परिचारिकांवर जबाबदारी सोडून ते घरी निघून गेले.
माहिती अधिकारातून मिळालेली माहिती – अॅड. गिते यांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती प्राप्त झाली. हॉस्पिटलच्या मालक डॉ. राधा मुकुंद संगमनेरकर यांनी अप्रशिक्षित परिचारिका सरिता सुतार यांना परिचारिका म्हणून नियुक्त केले होते. त्यांना इतर परिचारिकांसारखा पोशाख देण्यात आला होता. बी.ए. शिक्षण असूनही त्यांच्याकडून डॉक्टरांच्या अनुपस्थितीत सलाईन व इंजेक्शन देण्याची कामे करून घेतली जात होती. केस पेपरवर हॉस्पिटलचे नाव ‘चिन्मय इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स’ असे नमूद केले असून त्यावर ‘चिन्मय नर्सिंग होम’चा शिक्का मारण्यात आला आहे. अॅड. गिते यांनी पुणे महानगरपालिकेकडे या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता असे कोणतेही नोंदणी आढळले नाही. प्रत्यक्षात ‘चिन्मय नर्सिंग होम’ हे डॉ. राधा संगमनेरकर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे; मात्र केस पेपर ‘चिन्मय इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स’ या नावाने देण्यात येत होते.
















