तिकीटाचा खर्च कोणी करायचा : शिक्षा भोगल्यानंतर दुतावास झाला हतबल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फसवणुकीच्या प्रकरणात एका नायजेरीयन तरुणाला शिक्षा भोगल्यानंतर परत नेण्यासाठी नायजेरियन दुतावासाने हतबलता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या तिकीटाचा खर्च करायचा कोणी? असा एक वेगळाच तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या भामट्याची शिक्षा संपल्यानंतरही त्याचा पाहुणचार फरासखाना पोलिसांना करावा लागत आहे.
नायजेरियन फ्रॉडमध्ये या नागरिकाने तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगली. शिक्षा पूर्ण भोगल्यानंतरही दोन महिन्यांपासून तो फरासखाना पोलीस ठाण्यात आश्रयाला आहे. मायदेशात जाण्यासाठी नायजेरियन दुतावासाकडून आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडथळे आले. सध्या त्याची पुर्तता होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे त्याला मिळतील पण खरा प्रश्न त्यानंतरचा आहे. त्याच्या तिकीटाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मायदेशी परतण्यासाठी विमानाच्या तिकीटासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याने विनंती केल्यानंतरही नायजेरियन दुतावासाने तिकीट काढून देण्यासाठी तरतुद नसल्याचे स्पष्ट करत त्यास नकार कळवला.
यामुळे हा नागरिक आता मित्र मंडळींकडून तिकीट खर्चासाठी पैसे गोळा करत आहे. पण त्याला पैसे देण्यासाठी कोणीच उभे राहत नसल्याने त्याला आणखी किती दिवस फरासखाना पोलीस ठाण्यात काढावे लागतील, असा प्रश्न आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, ओनोरुयी नेमोये (37) याला एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला 2018 मध्ये न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली. फसवणूक प्रकरणात शिक्षा पूर्ण केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून तो फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेशांखाली राहत आहे. त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण अद्याप झालेले नाही.
नायजेरियन उच्चायुक्तालयाने आपत्कालीन प्रवास प्रमाणपत्रही जारी केलेले नाही. त्याला त्याच्या मूळ देशात परत जाण्यासाठी विमानाचे तिकीट मिळालेले नाही. त्याच्या अटकेसंदर्भात लांडगे म्हणाले, शहरातील एका व्यक्तीला स्वस्त दरात परकीय चलन देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्याला 18 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सप्टेंबरमध्ये त्याची येरवडा कारागृहातून सुटका झाली. यावर्षी त्याच्या मूळ देशासाठी कोणतीही उड्डाणे नसल्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला प्रतिबंधात्मक आदेश देऊन सोडले.
दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांनी मदत करावी : नेमोये
नेमोये म्हणाला, जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा नायजेरियाला जाण्यासाठी कोणतीही उड्डाणे नव्हती. मला प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले होते आणि माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. आता, मी पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ शकत नाही. मी पोलीस स्टेशनमध्येच झोपतो, खातो. आता उड्डाणे सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मला मदत करावी.
तो म्हणाला, ‘मी नायजेरियातून बिझनेस व्हिसावर भारतात आलो. मी दिल्लीत आलो आणि तिथे माझ्या देशातील मित्रांना भेटलो. मला कपड्यांचा व्यवसाय करायचा होता. ‘मी दिल्लीत राहत होतो आणि अचानक पुण्याहून पोलिसांनी येऊन मला अटक केली. माझे मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
माझे वडील सरकारी नोकरीत आहेत आणि माझी भावंडं नायजेरियातील कॅलबार येथे आहेत. माझे कुटुंबातील सदस्य गरीब आहेत आणि माझ्या विमान तिकिटांची व्यवस्था करू शकत नाहीत. माझे मित्र माझ्यासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करत आहेत.
नायजेरियन उच्चायुक्तांना पत्रे…
पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही नायजेरियन उच्चायुक्तांना पत्रे लिहिली आहेत आणि त्यांना नेमोयेला नायजेरियाला पाठवण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे. तथापि, त्यांनी अद्याप ईटीसी आणि त्याच्या पासपोर्टवर प्रक्रिया केलेली नाही’.
बांगलादेशी दाम्पत्य मायदेशीची आठवण…
सप्टेंबर महिन्यात एका बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आले. या जोडप्याने प्रतिबंधात्मक आदेशानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात 80 दिवस घालवले होते. या जोडप्याला भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. जून 2021 मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर बांगलादेश उच्चायुक्तालयाने त्यांच्या ईटीसीची अंमलबजावणी करेपर्यंत ते पोलीस स्टेशनमध्ये राहिले. यानंतर त्याची दखल घेत बांगलादेशी दाम्पत्याला परत पाठविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.