सिंहगड रोड परिसरातील घटना : हॉटेलची तोडफोड करीत ९४० रुपये नेले चोरून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले व हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा. लि. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडली.
याप्रकरणी लक्ष्मण मरीबा सोनवणे (वय २४, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाळा, तेजा, सत्या वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मण सोनवणे हे रिबेल फुल्डर्स या हॉटेलच्या बाहेर थांबले होते. या वेळी आरोपींनी हॉटेलचे मॅनेजर बिरास्वर दास यांना फुकट बिर्याणी मागितली. त्यांनी बिर्याणी फुकट देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांनी मॅनेजर दास यांच्या हातावर कोयता मारुन जखमी केले. तसेच सत्या वानखेडे याने कीचनमध्ये असलेल्या फ्रिजवर कोयत्याने मारुन नुकसान केले. तेजा याने गल्ल्यामध्ये हात घालून त्यातील ९४० रुपये चोरले. त्यानंतर परत जाताना हॉटेलमधील वस्तूंना दगड फेकून मारुन नुकसान केले. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सपकाळ तपास करीत आहेत.














