बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : लोणी काळभोर आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत चोरले मोबाईल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत असून अशाच एका चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी हिंदी सिनेस्टाईल पाठलाग करुन बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने मोबाईल चोरीचे 4 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही घटना घडली.
शंकर हनुमंत गायकवाड (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (दि.19) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक तरुणी पीएमटी बसने प्रवास करत होती. बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टॉपवर थांबली असता चोरट्याने तिच्या हातून मोबाईल हिसकावून पळून गेला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर पीएमटी सुरक्षा रक्षक तसेच बंडगार्ड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार प्रताप गायकवाड, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे यांनी चोरट्याचा पाठलाग केला. आरोपीला चोरीच्या मोबाईलसह ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने बंडगार्डन आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन असे एकूण 4 गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, बंड गार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे, पोलीस अंमलदार हरिष मोरे, प्रताप गायकवाड, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे, गौरव उभे, पाडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली.















