गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : जेजुरीजवळील कोळविहिरे गावात घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वयस्कर महिलेचा गळा दाबून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळविहीरे येथे पोलिसांनी कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना ही महिला तिच्या गावातील अलका दत्तात्रय नेवासकर (वय-60) या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कोळविहिरे गावात जाऊन संशयित महिलेच्या हालचालीवर पाळत ठेवली. त्यावेळी ती एका घरात जाताना दिसली. काहीवेळाने एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने पोलिसांनी तात्काळ घराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी आरोपी महिला वयस्कर महिलेचा गळा दाबून तिला मारहाण करत असल्याचे दिसून आले. आरोपी जबरदस्तीने वयस्कर महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडले. त्या महिलेच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














