हडपसर परिसरातील घटना : २०१६ पासून अल्पवयीन मुलीशी करीत होता मैत्रीचे नाटक!
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : अल्पवयीन असताना तिच्याशी मैत्रीचे नाटक करुन तिचा वेळोवेळी विनयभंग करुन घरातील दागिने घेऊन संपूर्ण कुटुंबाला दोघांनी गेली ५ वर्षे दहशतीखाली ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हडपसर पोलिसांनी सचिन सूर्यवंशी आणि संकेत कामठे (दोघे रा. फुरसुंगी गाव) यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सचिन सूर्यवंशी याने फिर्यादीचा पाठलाग करुन धमकी देऊन तिच्या सोबत मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. तुला नारायणपूरला देवदर्शनाला नेतो, असे म्हणून कारमध्ये बसवून तिला निर्जनस्थळी नेले. तेथे गाडी थांबवून जबरदस्तीने तिचा हात धरुन तिचे चुंबन घेतले. तिच्याशी प्रेमसंबंध ठेवून तिला वेळोवेळी धमकी देऊन घरातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. हे दागिने तिने परत मागितल्यावर परत करण्यास नकार देऊन तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. तिची गाडी जाळण्याची धमकी दिली. तिच्या घरात शिरुन तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या आईच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या भावाला दमदाटी करुन कोयत्याचा धाक दाखविला. अशा प्रकारे दोघांनी या कुटुंबाला २०१६ पासून मानसिक व शारीरीक त्रास देऊन दहशतीखाली ठेवले होते. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.
