हिंजवडीतील धक्कादायक प्रकार : ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’ कडून ‘पर्दाफाश’
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हिंजवडीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिरंगुट येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचं समोर आलंय. एका कंपनीत महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे स्वच्छतागृहात जाण्यापुर्वी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला जात होता. तसेच, महिलांना कार्यालयात यायला उशीर झाला तर बाहेर गेटवर थांबवले जात होते. हा धक्कादायक प्रकार मनसेने उघडकीस आणला आहे.
पिरंगुट येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात होती. तसेच महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. हा सर्व धक्कादायक प्रकार मनसेचे माथाडी कामगार नेते निलेश माझीरे यांना समजताच ते थेट कंपनीत दाखल झाले. तसेच, तेथील महिलांनी माझीरे यांच्यापुढे तक्रारी दिल्या. त्यानंतर मनसेने कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारला त्यावेळी त्या मॅनेजरने देखील या प्रकाराची कबुली दिली आहे.
दरम्यान, कंपनीतील एका महिलेने कळवले की, 5 महिलांना अचानक काढून टाकण्यात आलंय. त्या महिलेने दिलेल्या माहितीनंतर आम्ही ती कंपनी गाठली असता तिथल्या अनेक गोष्टी आमच्यासमोर आल्या आहेत.
महिलांनी गैरप्रकाराची तक्रार करायला सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे महिलांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. असं निलेश माझीरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर कंपनीतील पीडित महिला या प्रकरणाची तक्रार पौड पोलीस ठाण्यात करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.















