टोळीवर १० गुन्हे दाखल : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्या मंगेश माने व त्यांच्या टोळीतील इतर ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही 62 वी मोक्का कारवाई आहे.
मंगेश अनिल माने (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), लाडप्पा ऊर्फ अखिलेश ऊर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी (वय 20, रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक), सुरज अंकुश बोकडे (वय 22, रा. माऊलीनगर, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (रा. सासवड व अप्पर बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा), प्रतिक रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
मंगेश माने व त्यांच्या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहे. त्यांची कोंढवा, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार विना परवाना जवळ बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करुन त्याला मंजुरी दिली. प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत, सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, अनिल सुरवसे, अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, रुपनवर यांनी सहाय्य केले आहे.
