अग्नीशस्त्र जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-१ची कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.4) येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर सोसायटी जवळील गाडीतळ येथे करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीची एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शुभम उर्फ डांग्या जगन्नाथ शेळके (वय- 21 रा. सर्वे नंबर. 02 महाविर सोसायटी जवळ, गाडीतळ, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, खंडणी विरोधी पथक एक मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अतुल साठे यांना महावीर सोसायटी जवळ असलेल्या गाडीतळ येथे एक तरुण देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक विकास जाधव, पोलीस हवालदार अतुल साठे, संजय भापकर, पोलीस नाईक रमेश चौधर, गजानन सोनवलकर, नितीन कांबळे, पोलीस शिपाई अमर पवार यांच्या पथकाने केली.
