पोलीस आयुक्तांचा आदेश पारित : स्वारगेट परिसरात पसरवित होता दहशत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात दहशत परसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई कऱण्यात आली आहे.
रवींद्र ऊर्फ बल्ली वसंत कांबळे (वय ३०, रा. डायस प्लॉट गुलटेकडी, पुणे) असे कारवाई कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, रवींद्र ऊर्फ बल्ली वसंत कांबळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्या साथीदारासह स्वारगेट, विश्रामबाग, खडक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे हद्दीमध्ये तलवार, लोखंडी रॉ़ड, लोखंडी कोयता, लाकडी बांदूसारख्या जीवघेण्या हत्यासारांसह फिरून खुनाचा प्रयत्न, अनैसर्गिक अपराध, अपनयन, बाललैंगिक अपराध, जबरी चोरी, घातक शस्त्रांसह दुखापत, जबर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
मागिल पाच वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होण्याच्या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्याविरुद्धचे सर्व प्रस्ताव पडताळून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे एक वर्षाकरिता स्थानबद्धतेचे आदेश पारित केले आहेत. आरोपीला स्थानबद्ध करण्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पीसीबी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्तांनी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार मागिल एक वर्षभरामध्ये ४८ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
