कोंढव्यातील खळबळजनक घटना : कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक!
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहन कर्जासह वेगवेगळ्या कामासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी प्रोसेसिंग फी व डिपॉझिटच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन पतपेढी बंद करुन चेअरमनसह कर्मचारी फरार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी टी. एस. मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे चेअरमन व कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेअरमन नशीब शेख (वय ४५), कर्मचारी मोहसीन झुल्फीकार पठाण (वय ३०) आणि राजे राठोड (वय ३२, सर्व रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओमकार सुरेश लोखंडे (वय २५, रा. महमंदवाडी रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नशीब शेख याने टी एस मल्टीस्टेट को – ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेचे कोंढव्यातील कोनॉर्क प्लाझामध्ये कार्यालय सुरु केले होते. फिर्यादी यांचा टुरीस्टचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांना एक्सेंट टी परमिटची नवी गाडी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचे कर्ज हवे होते. चेअरमन नशीब शेख याने कर्ज देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फी व डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना १६ मार्च रोजी ७ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, पतपेढीच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो परत आला.
दरम्यान शेख याने पतपेढी बंद करुन फरार झाला होता. लोखंडे यांच्या प्रमाणेच शेख याने अनेकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेक खातेधारकांची फसवणूक केली असून कोंढवा पोलिसांकडे खातेधारक तक्रार घेऊन येत आहे. आतापर्यंत ५ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.
