तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा : कामगारानेच साधला डाव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शर्टच्या कॉलरवर कीडा असल्याचे सांगून कामगाराने मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. आरोपी कामगाराने मालकाच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी हिसका मारुन चोरून नेली. ही घटना बेबडओव्हळ गावच्या हद्दीत घडली.
शिवशंकर (पूर्णनाव पत्ता माहित नाही रा. उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल शंकरराव ढमाले (वय-42 रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, राहुल ढमाले यांचे इंजीनियरिंग वर्कशॉप आहे. याठिकाणी आरोपी शिवशंकर हा कामाला आहे. त्याला घरी सोडण्यासाठी ढमाले त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलर पर किडा है, असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली आणि पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
