सोलापूर पोलिसांची कामगिरी : वैराग येथे बेवारस अवस्थेत आढळली कार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे तुळजापूर येथून चोरीस गेलेली चारचाकी क्रूझर व तीन मोबाईल असा एकूण ७ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तीन मोबाईल आणि एक कार असा एकूण ७ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तुळजापूर येथील तपासी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आला.
सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे सोलापूर तालुका पोलिसांना मदत झाली.
तुळजापूर येथून २० डिसेंबर २०२१ रोजी चारचाकी क्रूझर चोरी झाल्याबाबत वैराग पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक परजने यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे वैराग येथून सोलापूरच्या दिशेने वाहन येत असल्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अरुण फुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना तुळजापूर येथून चोरी झालेल्या क्रूझरबाबत माहिती देऊन शोध घेण्यास सांगितले.
दरम्यान, मौजे गावडी दारफळ (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील महार वतनच्या जागेत बेवारस वाहन लावण्याची माहिती २१ डिसेंबर २०२१ रोजी सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने वाहन ताब्यात घेऊन तपास केला असता त्यामध्ये तीन मोबाईल आणि एक कार असा एकूण ७ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तुळजापूर येथील तपासी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आला.
सोलापूरचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलीस नाईक श्रीराम आदलिंग यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
