दोघांच्या आवळल्या मुसक्या : कोंढवा पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा कारागृहातून दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 74 हजार 920 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी एन.आय.बी.एम कडून उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मंगळवारी (दि.21) केली आहे.
शाबीर शमशुद्दीन शेख (वय-45 रा.मिलींद पार्क, कोंढवा खुर्द) आणि शाहरुख समशेर शेख (वय-29 रा. जनवाडी मशीद मागे, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या वनविभागाच्या जागेच्या समोर दोन व्यक्ती संशयित आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले 74 हजार 920 रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच 1220 रुपयांची रोख रक्कम मिळाली. पोलिसांनी दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस नाईक जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतिश चव्हाण लक्ष्मण होळकर, पोलीस शिपाई किशोर वळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.
