खडक पोलिसांत गुन्हा : छत्रपती शिवाजी रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल आणि खिशातील १४ हजार ५०० रुपये लुटून नेले. छत्रपती शिवाजी रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ १ जानेवारी २०२२ रोजी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
उमेश शिंदे (वय ४५, रा. ८८८, शुक्रवार पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार चार अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने शुक्रवार पेठेतील घरी पायी जात होते. त्यावेळी म्हसोबा मंदिराजवळ दोन अनोळखी व्यक्ती स्कूटरवरून आले आणि हाताला धरून पदपथावर ओढून नेत लाथाबुक्क्यांनी, पेव्हर ब्लॉक, दगडाने डोक्यात मारहाण करून खिशातील मोबाईल व पाकिट असा एकूण १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतरही आरोपींनी लाथांनी व रस्त्यावर पडलेल्या दगडाने मारहाण केली. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे पुढील तपास करीत आहेत.
