मुंढवा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा : लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रिक्षा नेली ओढून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मस्तवाल फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी लोकांचा वापर करुन लोकांना मारहाण करुन जबरदस्तीने वाहने ओढून घेऊन जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत असतानाच महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन रिक्षा जबरदस्तीने ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. 9 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेची दखल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी घेऊन आता केवळ गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा पोलिसांनी फायनान्स कंपनीचे पिटर मोरे आणि सॅम अशा दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी घोरपडीगावातील एका 32 वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या पतीने रिक्षासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते थकल्याने 9 डिसेंबर रोजी साडेबाराच्या सुमारास फायनान्सचे लोक त्यांच्या घरी आले होते. ते रिक्षा ओढून घेऊन जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी रिक्षा घेऊन जाऊ नका, असे सांगत असताना त्यातील एकाने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. फिर्यादी यांना बुरख्यासह त्याच्याजवळ ओढून घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन करुन विनयभंग केला. फिर्यादीच्या पतीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पतीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटून तो फोडला. फिर्यादीच्या पतीने रिक्षाची चावी दिली नाही म्हणून या गुंडांनी रिक्षाचे हॅन्डल लॉक दगडाने तोडून रिक्षामधील रोख रक्कम, लायसन्स, रिक्षाच्या बॅचसह रिक्षा ओढून घेऊन गेले.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बंडगार्डन पोलिसांनी ती मुंढवा पोलिसांकडे पाठविली. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
