टीईटी पेपरफुटी प्रकरण : जीए सॉफ्टवेअरचे गणेशन याचाही सहभाग उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी जीए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार आणि डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख यांना अटक केली आहे. आता याप्रकरणात जीए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पुणे सायबर पोलिसांनी गणेशन याला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली असून अद्याप तो हजर झालेला नाही.
टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अश्विन कुमार, सौरभ महेश त्रिपाठी आणि निखिल वसंत कदम (वय-36 रा. काळेवाडी, पिंपरी, मुळ रा.मोरगाव ता. बारामती) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी आज (रविवार) न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी सांगितले की, जीए सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक गणेशन (रा. बंगलुरु) याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, सुखदेव ढेरे याच्या घराची झडती घेतली असता 2 लाख 90 हजार 380 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निखिल कदम याच्याकडे असलेल्या मोबाईलमधून अश्विन कुमार याला पाठवलेले ई-मेल मिळाले आहेत. कदम याने अश्विन कुमार याला 56 परीक्षार्थींची यादी दिली होती. या परीक्षार्थींकडून प्रत्येकी 40 हजार रुपये घेतल्याचे ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
जीए सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा कर्मचारी शेखर मस्तुद याच्या मदतीने अश्विन कुमार याने 700 परीक्षार्थींचे गुण बदलून ती माहिती टीईटी 2018 या मेन सर्व्हरवर अपलोड करुन घेतले.
या 700 परीक्षार्थींची रोल नंबर आणि गुण असलेली यादी पेनड्राईव्ह मधून अश्विनकुमार याला दिली असून, हा पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. न्यायालयाने अश्विनकुमार व सौरभ त्रिपाठी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून निखिल कदम याला 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
