डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद : खिडकीचे गज कापून दागिन्यांची केली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या पुण्यातील बहिणीच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी पुण्यातील प्रभात रस्ता परिसरात घडली. चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने चोरुन नेले.
उज्वला वसंत पारसनीस (वय-63 रा. अभिमान अपार्टमेंट, पाचवी गल्ली, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, उज्वला पारसनीस या घरात एकट्या राहतात. गुरुवारी सायंकाळी त्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री घरी परत आल्यानंतर घराच्या खिडकीचे गज कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी रुममधील एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
