सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : पोलीस अधिकाऱ्याच्या जागेत बिल्डरचे बेकायदा अतिक्रमण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जागेमध्ये असलेले कंपाउंड तोडून रस्ता खोदून ऑफिस बांधल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विजय दशरथ कदम (वय-57 रा. धनकवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विजय कदम हे पुणे पोलीस दलामध्ये विशेष शाखा येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. विजय कदम यांचे वडील देखील पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून धायरी येथे 1990 मध्ये चार गुंठे जागा खरेदी केली होती. फिर्यादी यांच्या जागेजवळ वैष्णवी प्रमोटर्स आणि बिल्डर्स प्रा. लि. यांनी 2005 मध्ये बांधकाम सुरु केले होते. त्यावेळी वैष्णवी प्रमोटर्सचे गणेश पोकळे यांनी फिर्यादी यांच्याकडे त्यांचे 4 गुंठे जमीनीची मागणी केली. या बदल्यात त्यांना शेवटचे प्लॉट देण्याचे ठरले होते. गणेश पोकळे यांनी फिर्यादी यांचे प्लॉट घेऊन त्यांना त्या बदल्यात 20 फुटी रस्त्यासह गुंठेवारी नियमितीकरणाचा दाखला देऊन रजीस्टरी दस्त नोंद करुन कुंपन घालून फिर्यादी यांच्या ताब्यात दिला होता.
दरम्यान, एप्रिल 2021 मध्ये समेरु बिल्डकॉन या कंपनीने फिर्यादी यांच्या रस्त्यावर राडारोडा आणून टाकल्याचे समजले. तसेच, फिर्यादी यांचा जाण्या-येण्याचा रस्ता अडवून त्यावर त्यांचे ऑफिस बांधले होते. याशिवाय फिर्यादी यांच्या प्लॉटमध्ये रस्ता तयार केला. यानंतर फिर्यादी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे पुढील तपास करीत आहेत.
यासंदर्भात विजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गणेश पोकळे यांची अडचण समजून आम्ही त्यांना आमचा प्लॉट दिला होता. त्या बदल्यात दिलेल्या प्लॉटवर जाण्यासाठी दिलेला रस्ता अडवून त्याठिकाणी कार्यालय बांधले आहे. तसेच 40 फूट खोल खड्डा खांदला आहे. त्यामुळे नवज्योत अभा या नावाने निवासी इमारत बांधणाऱ्या सुमेरु बिल्डकॉन या कंपनी विरुद्ध तक्रार दिली आहे.














