लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : १८ गुंठे जमीन आणि चार लाख ६० हजार घेतले व्याजापोटी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सात लाखाचे चार लाख ६० हजार रुपये आणि १८ गुंठे जमीन नावावर करून घेणाऱ्या सावकाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ५७ लाख ३८ हजार ५४० रुपये, सोन्याचे दागिने ४८ लाख ६२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले.
स्वप्नील राजाराम कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले की, विकास रामदास कटके (वय ३०, रा. आष्टापूर- माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून राजाराम कांचन (रा. उरुळी कांचन), प्रशांत गोते (रा. भिवरी, ता. हवेली, जि. पुणे) आणि इतर दोन-तीन अनोळखींनी संगनमताने २०१६ ते आजपर्यंत स्वप्नील कांचन याच्याकडून घेतलेल्या सात लाख रुपयांचे व्याज म्हणून चार लाख ६० हजार रुपये घेऊन १८ गुंठे जमीन प्रशांत गोते (रा. भिवरी, ता. हवेली) याच्या नावावर करून घेतली. त्यामुळे फिर्यादीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतरही व्याजाचे पैसे शिल्लक आहे, असे सांगून फिर्यादीची वडिलोपार्जित जमीन व्याजापोटी नावावर करून देण्यासाठी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत जाच करीत असल्याची तक्रार दिल्याने गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी आरोपीच्या घर व ऑफिसची झडती घेऊन ५७ लाख ३८ हजार ५४० रुपये, सोन्याचे दागिने ४८ लाख ६२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्याकडील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
