गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई – चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती फिर्याद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी सावकार व्याजापोटी मनमानी पद्धतीने पैसे वसूल करीत असल्याच्या तक्रारी पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सावकाराचा अजब कारभार समोर आला आहे. सावकारीचा परवाना नसताना 20 लाख रुपये व्याजाने दिल्यानंतर वसुलीसाठी दुकानात जाऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
किशोर सदाशिव खळदकर (वय 38, रा. जातेगाव, ता. शिरुर) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी नारायण रामलाल चौधरी (वय 41, रा. योगेश्वर सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, किशोर खळदकर याने चौधरी यांना 20 लाख रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजाने दिले. त्यानंतर फिर्यादीस वारंवार फोन करुन पैसे देण्यासाठी तगादा लावून न दिल्यास जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ केली. शिक्रापूर येथील बाबा गारमेंट नावाच्या दुकानामध्ये फिर्यादी नसताना जबरदस्तीने आत येऊन मुद्दल व व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या भावाला व कामगारांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याजवळ फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी खळदकर याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
