पुणे-मुंबई जुना महामार्ग : कारमधील चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कारने दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरुन आलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ३ महिला, चालकासह ५ जण जागीच ठार झाले आहे. अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
महामार्ग पोलिसांनी सांगितले की, ही कार हरियाना पासिंगची असून अपघातात ठार झालेले सर्व जण मुंबईला राहणारे आहेत. मुंबईहून ही कार पुण्याकडे येत होती. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्याच्यामध्ये असलेला दुभाजक तोडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कार आली. त्याचवेळी समोरुन आलेल्या कंटेनरखाली ही कार घुसली. कारमधील सर्व ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरखाली अडकलेली कार व प्रवासी यांना बाहेर काढले. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
